Monday, 9 February 2015

शरणागता...

मी COEP मध्ये इंजीनियरींग शिकत(?) होतो तेव्हाची गोष्ट आहे...साल असेल २००६...Debating Group ची बोट क्लब वर मीटिंग चालू होती आणि वाद चालू होता : संदीप खरे - सलील कुलकर्णी जोडीचं संगीत अभिजात आहे की नाही? आमचा गिरीश दातार म्हणत होता..."'आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते" हे नक्कीच अभिजात आहे”, तर नचिकेत जोशी सांगत होता..."अप्रतिम आहे, पण म्हणून ते अभिजात होत नाही."  (हे असले वाद COEP च्या बोट क्लब वर होतात!)  कुणीतरी माझं मत विचारलं तर मी क्षणभर गांगरलोच. 'शुक्रतारा मंदवारा' हे शास्त्रीय संगीत नसून सुगम संगीत आहे हे नुकतंच मला तेव्हा कळलं होतं, तेव्हा ह्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर 'अभिजात संगीत' ह्या विषयावर मी काय उत्तर देणार होतो? "माझ्या मते भीमसेन जोशी हे अभिजात संगीताचं उदाहरण आहे, सलिल अजून कुठेच नाही" असं बावळट उत्तर देऊन मी मोकळा झालो. नच्या जोशी मला बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला "मित्रा, बोललास त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर भीमसेन नीट ऐक. आयुष्यात काहीतरी केल्याचं समाधान मिळेल."

भीमसेन काय चीज आहे ते मला उमगलं नसलं तरी त्याची थोडीफार कल्पना तर नक्कीच होती. मुळात शास्त्रीय संगीत ह्या प्रकाराबद्दल कुतूहलापेक्षा भीतीच जास्त होती तेव्हा. कधीतरी TV वर  DD Bharti वर एखाद्या जुन्या कार्यक्रमामध्ये अर्धा अर्धा तास चाललेल्या एकच आलापावर माना डोलावणारे रसिक श्रोते पाहीले की मला दडपण यायचं. त्यामुळे त्या वाटेला कधी गेलोच नव्हतो. २००६ ला अगदी अनपेक्षितपणे एक योग आला आणि अखेर मला 'अद्वैताची प्रचीती' आली. तो योग सुद्धा काहीसा विचित्रच होता. Magazine साठी अतुल कुलकर्णी ची मुलाखत घ्यायला Fergusson College ला एकदा गेलो होतो तेव्हा अनिरुद्ध बापट नावाच्या एका अवलीयाशी ओळख झाली होती. बापट गुरुजी (अनिरुद्ध उर्फ अन्या उर्फ भिंगरी बापट ह्यांचे अजून एक टोपणनाव) हे स्वत: शास्त्रीय संगीताचे निस्सीम चाहते पण त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर "देवाने साला आवाज असा दिलाय की फार फार तर हिमेश रेशमिया ची गाणी गाऊ शकेन." गाण्याची अतिशय हौस असूनही रागदारी 'झेपल्याने' अन्या सुगम संगीत शिकायला जात होता, पण श्रोता ताकदीचा होता. सवाई गंधर्व च्या दर वर्षी नेमाने वाऱ्या करणाऱ्या मंडळींपैकी होता. २००६ सालच्या डिसेंबर मध्ये एका गारठलेल्या सकाळी त्याचा फोन आला, "सवाई गंधर्व ला चल उद्या माझ्याबरोबर, दोन VIP पास ढापलेत." मी म्हणालो, "मी आलो तर गादी उशी घेऊन येईन, कारण मी नक्की १५ मिनिटात झोपेन ह्याची मला खात्री आहे. अशी लाज काढून घेण्यापेक्षा दुसऱ्या कुणालातरी घेऊन जा." अन्याला माहिती होतं मी काय सांगितल्यावर येणार ...म्हणाला "भावा, Google वर कौशिकी चक्रवर्ती टाक, फोटो बघ, ती येणार आहे उद्या गायला. आलास तर तिच्यासोबत फोटो काढून घ्यायची संधी आहे. कळव मला." १० मिनिटात मी माझा होकार कळवला.

माझ्या डायरीमधील नोंदीप्रमाणे डिसेंबर २००६ हा तो दिवस. संध्याकाळी :३० च्या सुमारास मी आणि अन्या सवाई च्या मंडपात पोचलो. 'आजच्या काळात classical कोण ऐकतो?' ह्या माझ्या अज्ञानी मानसिकतेचे उत्तर गर्दीने खचाखच भरलेल्या मांडवाच्या प्रथम दर्शनानेच दिले. गुरुजींकडे VIP passes नसते तर आम्हाला बसायला चांगली जागा मिळणे अशक्यच होते. अखेर जिच्यासाठी 'केला होता अट्टाहास' ती कौशिकी आली. VIP जागेतून अगदी जवळून पाहायला मिळाली. त्याकाळी मोबाईल फोन्स इतके प्रचलित नव्हते आणि जे अगदी महाग असे होते त्यांना सुद्धा फार फार तर 2MP camera असायचा. मी तर माझा १८५७ च्या युद्धातला Nokia 1100 घेऊन गेलो होतो, त्यामुळे अन्याकडे असलेल्या Kodak च्या रोल वाल्या camera वरच सगळे निर्भर होते. कौशिकी अशी गायली की तिच्या सौंदर्याने घायाळ व्हावं का गाण्याने असा चक्क मला प्रश्न पडला. पहिलीच चीज अशी गायली की हा कुठला राग आहे असं मी अभावितपणे अन्याला विचारलं आणि 'राग रागेश्री' अशी एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून ठेवलं. त्यानंतर ती एक ठुमरी गायली...कुठली ते आठवत नाही पण त्या प्रकाराला ठुमरी म्हणतात आणि तिने गायलेली ठुमरी आधी शोभा गुर्टू ह्यांनी अजरामर करून ठेवली आहे अशी अन्याकडून माहिती मिळाली. अन्याची संयोजकांपैकी एकाशी चांगली ओळख होती म्हणून नंतर आम्हाला कलावंतांसाठी खास तयार केलेल्या बैठकीत आतपर्यंत जाऊन कौशिकीला प्रत्यक्ष भेटता आले आणि तिच्यासोबत फोटो पण काढून घेता आला. Orkut च्या जुन्या archieves मध्ये माझ्या profile वर आजही तो फोटो असेल जो तेव्हा केवळ Facebook प्रचलित नसल्याने जास्त प्रसिद्ध होऊ शकला नाही!  दुसऱ्या दिवशी मी स्वत: अन्याच्या मागे लागून त्याच्यासोबत गेलो. १० डिसेंबर हा त्या वर्षीचा सवाई गंधर्व महोत्सवाचा शेवटचा दिवस होता त्यामुळे त्या दिवशी दुप्पट गर्दी होती. आम्हाला पोचायला थोडा वेळ लागला आणि हेमंत पेंडसे ह्याचं गाणं miss झालं. आम्ही पोचलो तेव्हा श्री. अनंत तेरदाळ गात होते. ते पं. भीमसेन जोशींचे शिष्य आहेत आणि काही काळात दस्तुरखुद्द पंडितजी सुद्धा येणार आहेत ही बातमी समजली. अनंतराव असे पट्टीचे गायले की अक्षरश: अंगावर शहारे उभे राहीले. मला अजूनसुद्धा त्यांनी गायलेला 'राग मुलतानी' आठवतो. शास्त्रीय संगीतात काय ताकद आहे ते मी प्रथमच अनुभवत होतो आणि विशेषत: मला स्वत:ला ते खूप आवडतंय हा पण नवीनच साक्षात्कार होत होता. साधारण पाऊण तास मुलतानी मध्ये चिंब भिजल्यावर श्रोत्यांनी त्यांना भजन गाण्याचा आग्रह केला आणि त्यांनी 'कान्होबा तुझी घोंगडी' सुरु केलं. मी ते भजन तेव्हा पहिल्यांदा ऐकलं आणि खरोखर भारावून गेलो. 'किती अप्रतिम कलाकृती आहेत ज्यांचा केवळ अज्ञानामुळे मी आधी आस्वाद घेऊ शकलो नाही' अश्या विचाराचा एक भुंगा माझं मन पोखरू लागला आणि त्याबरोबरच 'अजून असं किती आहे की ज्याची आपल्याला सुतराम कल्पनासुद्धा नाही' ह्या न्यूनगंडाने मी पछाडलो गेलो. साधारण :३० च्या सुमारास पंडितजींच आगमन झालं. अक्खा मंडप, श्रोतृगण, वाद्यवृंद, गायक सगळेच उठून उभे राहीले आणि टाळ्यांच्या कडकडाटात पंडितजींच स्वागत झालं. शुभा मुद्गल ह्यांच्या गायनाला सुरुवात झाली आणि मंडळी पुन्हा एकदा रममाण होऊन गेली. त्यांचं गाणं मला चांगलंच जड गेलं कारण त्यांनी बंदिश गाता धृपद style मध्ये राग मारुबिहाग गायला सुरुवात केली. जमलेल्यांपैकी जे जाणकार होते त्यांच्या प्रत्येक समेवर येणाऱ्या टाळ्यांनी आणि 'वाह वाह ' च्या उद्घोशांनी मला अगदी अस्वस्थ करून सोडलं. इतकं सुंदर काहीतरी साकार होतंय आणि आपण अभागी की ते उमजू शकत नाही अश्या अपार खिन्नतेने मला आतून खूप वाईट वाटत होतं. पेटीवाला पण असा पट्टीचा तरबेज होता की गायिकेच्या अथांग प्रतिभेला प्रभावी दाद देणारी सरगम त्या वाद्यातून निघत होती आणि सुमारे १५ मिनिटे चाललेल्या त्या जुगलबंदीने सगळ्यांना एका जागी खिळवून ठेवलं होतं. गाणं संपलं तेव्हा जणू काही मुसळधार पावसानंतर अचानक वातावरण शांत होतं तसं वाटलं. एव्हाना माझ्यातला मी कधीच हरवलो होतो आणि माझं अस्तित्व तिथल्या सुरांमध्ये जणू विरघळून गेलं होतं. देवाच्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या श्रद्धाळूप्रमाणे हात जोडून ते दिसतंय, ऐकू येतंय, अनुभवता येतंय त्याचं सश्रद्ध आकलन करणे इतकंच चालू होतं. अभूतपूर्व असा प्रतिसाद तर अपेक्षित होताच, पण जेव्हा पंडितजींनी स्वत: उभे राहून दाद दिली तेव्हा शुभा मुद्गल चक्क रडल्या. १०००० च्या संख्येने जमलेल्या श्रोतृवर्गाने जिला मानवंदना दिली अशी ती सुरसाम्राज्ञी स्वत: लहान मुलासारखी रडते ह्यातच त्या कौतुकाचं श्रेष्ठत्व आलं. नंतर समस्त जनसमुदायाने पंडितजींना गाण्याचा आग्रह केला. पंडितजींची तब्येत खराब होती पण केवळ लोकांच्या आग्रहाखातर ते ५ मिनिटे 'तीर्थ विठ्ठल' गायले. काय त्या प्रसंगाचे वर्णन करू....शब्दच नाहीत. 'देव विठ्ठलSSSSS देवपूजाSSSS विठ्ठल'...इतकी आर्तता होती त्या हाकेत की असं वाटलं की पांडुरंग स्वत: धावत येईल ह्या भक्ताकडे! मी स्वत: आजूबाजूला किती जणांच्या डोळ्यांना धारा लागलेल्या पाहिल्या. अख्ख्या मांडवात pin drop silence आणि फक्त पंडितजींचा दैवी आवाज गाभाऱ्यात शंखनाद घुमावा तसा घुमतोय असा तो विलक्षण प्रसंग होता. अंगावर काटा फुललाय अशी पुसट शंका येउन मी माझ्या हाताकडे पाहायला खाली मान केली तर माझ्याच डोळ्यातून अश्रू माझ्या हातावर पडल्याचं जाणवलं. काही गोष्टी कश्या आपल्याला कधीच उमगत नाहीत तसं काहीसं वाटत होतं. जाणीवा आणि नेणीवा ह्यांच्या पलीकडून काहीतरी आपल्याला बोलावतंय आणि आपण एखाद्या पिसासारखे हवेत अलगद तरंगत तिकडे वाहून चाललोत अशी काहीशी ती तंद्री होती. अन्याच्या भाषेत ह्या अवस्थेला 'परम सुख' म्हणतात. 'भीमसेन जोशी' ही काय चीज आहे हे त्या दिवशी समजलं आणि तेव्हापासून त्यांची भक्ती सुरु झाली ती आजपर्यंत अखंड चालू आहे आणि शेवटपर्यंत चालूच राहील.

तेव्हापासून classical ऐकतोय पण इतकी वर्ष होऊन अतृप्तेची भावना आहे तशीच आहे. Youtube, cooltoad आणि दादर च्या अलूरकर म्युझिक हाउस मधून आणलेल्या असंख्य CDs ह्यांच्या कृपेने अर्जुनाच्या अक्षय्य भात्याप्रमाणे अखंड आराधना चालूच आहे. पंडितजींच्या मुळे सुरु झालेली तृष्णा दिवसेंदिवस वृद्धिंगतच होते आहे. खरं तर मला अजून सुद्धा रागदारी मधील इतकं काही कळत नाही कारण त्याचा शास्त्रीय अभ्यास नाही. इतकी वर्षे ऐकल्यावर आता कुठे मला राग तोडी किंवा भैरवी थोडे थोडे ओळखू येतात पण तोडी मध्ये बिलासखानी कुठली, गुजरी कुठली किंवा मियांकी तोडी कुठली विचारलं तर दांडी गुल! टप्पा आणि ठुमरी मधील फरक अजूनही कळत नाही. पंडितजी म्हणा किंवा वसंतराव देशपांडे म्हणा, गाताना तार सप्तकातून मन्ध्रात झटकन कसे येतात आणि पेटीवाल्याची फिरकी घेऊन त्याची सम कशी चुकवतात ते पुन्हा पुन्हा पाहून ऐकून पण समजत नाही. वसंत पोतदारांनी लिहिलेलं 'भीमसेन' आतापर्यंत वेळा तरी वाचून झालं असेल पण काही काही गोष्टी इतक्या अविश्वसनीय वाटतात की पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय राहवत नाही. पंडितजी किराणा घराण्याचे म्हणून मध्ये wikipedia वर शोध घेतला तर एखाद्या खजिन्याचा शोध लागावा तसंच काहीसं झालं. ह्या किराणा घराण्याला समुद्रमंथनाची उपमा देणेच सयुक्तिक ठरेल कारण त्यातून केवळ रत्ने निजपली आहेत. अब्दुल करीम खान पासून चालू झालेली परमोच्च कीर्तीची परंपरा अगदी आजच्या 'बालगंधर्व' fame आनंद भाटे ह्यांच्यापर्यंत अखंड सुरु आहे. सर्वांना माहिती असलेली ठळक ठळक नवे घ्यायची म्हटली तरी इतकी आहेत ...सवाई गंधर्व, केसरबाई केरकर, रोशनारा बेगम, सुरेशबाबू माने, बेगम अख्तर, हिराबाई बडोदेकर, गंगुबाई हंगल, भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, सरस्वती राणे, प्रभा अत्रे, माधव गुडी ...इतकेच नव्हे तर मोहम्मद रफी सुद्धा! सगळीच बहुमोल रत्ने. बेगम अख्तर ह्यांचे दर्दी शौकीन घराघरात आढळतील. एक काळ असा त्यांनी गाजवलाय की अख्तरी बाईंच गाणं झाल्याशिवाय radio broadcast संपत नसे. ' मोहब्बत' असो किंवा 'दिवाना बनाना' असो किंवा 'दिल की बात' असो, ठुमरी गावी तर ती फक्त बेगम अख्तर ह्यांनीच! केसरबाईंच 'जात कहा हो' पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तर आठवडे फक्त तेच ऐकत होतो. त्यातल्या 'कहा' ह्या शब्दावर जी काही हरकत घेतली आहे ती इतकी लाजवाब आहे की कुणीही ते परत एकदा ऐकल्याशिवाय राहणार नाही. १९७७ साली NASA ने Voyager spacecraft अंतरिक्षात पाठवलं तेव्हा त्यात एक तबकडी पाठवली आहे जी Voyager Golden Record नावाने प्रसिद्ध आहे. Robert Brown ह्या प्रसिद्ध ethnomusicologist ने 'जात कहा हो' चा समावेश त्या तबकडीमध्ये केला आहे ज्याच्या मते भारतीय शास्त्रीय संगीताचे ते सर्वोत्तम उदाहरण आहे. आजच्या घडीला Voyager spacecraft ही पृथ्वीपासून सर्वाधिक दूर पोचलेली मानवनिर्मित गोष्ट आहे आणि त्याबरोबरच राग भैरवीतील ही अजरामर पेशकश आज interstellar space मध्ये पोचली आहे.

काही गायक आणि त्यांच्या काही ठराविक बंदिशी ह्या इतक्या बेजोड आहेत की आज कित्येक दशकांच्या नंतर देखील रसिकांच्या ओठात आणि हृदयात त्या घर करून बसल्या आहेत. उदाहरणे द्यायची झाली तर किराणा घराण्याचे आद्य कीर्तिवंत उस्ताद अब्दुल करीम खान ह्यांच्या 'जमुना के तीर' चं देत येईल. कित्येक वर्षे चालू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता आज देखील खांसाहेबांच्या 'जमुना के तीर' च्या रेकॉर्ड ने होते. ही स्वररचना मी स्वतसवाई गंधर्व, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, गंगुबाई हंगल अश्या बड्या कलावंतांच्या आवाजातील पण ऐकली आहे, पण शेवटी जेव्हा परत खांसाहेबांच्या आवाजातील रेकॉर्ड ऐकतो तेव्हा समजतं की 'उस्ताद उस्ताद होता है और शागिर्द शागिर्द होता है'! बालगंधर्व म्हणजे 'शरणागता' किंवा 'वद जाऊ कुणाला शरण' आलंच पाहीजे. दीनानाथ मंगेशकर म्हणजे 'मर्मबंधातली ठेव ही' आणि 'परवशता पाश दैवे' झालंच पाहीजे. मास्टर कृष्णराव - 'प्रिये पहा', बकुळ पंडीत - 'का धरिला परदेस', जितेंद्र अभिषेकी - 'काटा रुते कुणाला', किशोरी आमोणकर - 'अवघा रंग एक झाला', छोटा गंधर्व - 'बहुत दिन नच भेटलो सुंदरीला', माणिक वर्मा - 'स्वकुल तारक सुता', शोभा गुर्टू - 'याद पिया की आये', वसंतराव देशपांडे - 'रवि मी', हिराबाई बडोदेकर - 'किती किती सांगू तुला', आरती अंकलीकर - 'मी राधिका',  प्रकाश घांग्रेकर - 'मानिनी सोड तुझा अभिमान', रामदास कामत - 'गुंतता हृदय हे', मधुवंती दांडेकर - 'पतित तू पावना', आशा खाडिलकर - 'शूरा मी वंदिले', राम मराठे - 'चंद्रिका ही जणू'....मला वाटतं ही यादी संपणारच नाही. हा इतका अनमोल ठेवा आहे की ज्या काही गोष्टींमुळे मराठी म्हणून जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटावा अश्या यादी मध्ये ह्या कलाकृतींचा नंबर अगदी वरचा लागेल. आजकाल म्हणावं तितकंसं glamour शास्त्रीय संगीताला राहिलं नाही ह्याची खरच खंत वाटते. आज सगळा फास्ट फूडचा जमाना आहे, लोकांना सगळं कसं instant हवं असतं. पण जे काही instant आहे ते constant आहे का ह्याचा विचार होत नाही. क्षणभंगुर मनोरंजनापेक्षा शाश्वत सुख नक्कीच श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच कित्येक दशकांपूर्वी निर्मिलेल्या ह्या कलाकृती आजही तितकंच प्रफुल्लित करतात. तसं आजच्या घडीला सुद्धा काही कलावंत उत्तम काम करतायत जी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. सध्या कौशिकीच्या 'आज जाने की जिद करो' नं चांगलीच मोहिनी घातलीये. सुबोध भावे आणि राहुल देशपांडे ह्यांच्या कृपेमुळे मध्ये वर्षांपूर्वी 'कट्यार काळजात घुसली' नवीन संचात वाशीला विष्णुदास भावे ला पाहता आलं. जरी गाणी संक्षिप्त केली असली तरी त्या निमित्ताने संगीत नाटक प्रत्यक्ष पाहिल्याचं समाधान मिळालं. पहिल्या घंटेपूर्वीचा तो शंखनाद, उदबत्त्यांचा दरवळ, नारळ फोडून गूळ खोबरे प्रसाद म्हणून प्रेक्षागृहात वाटणे, हार्मोनियम आणि तबला ह्यांची नांदीच्या आधीची जुगलबंदी, गणेशवंदन करणारी नांदी आणि भरजरी शालू नेसून पुरुष कलाकारांची रंगमंचावरची लगबग otherwise कधी पाहायला मिळालीच नसती. राहुल ने 'सुरत पियाकी' आणि 'ह्या भवनातील गीत पुराणे' चांगलीच ताकदीने सादर केली. त्याचं 'बालगंधर्व' मधलं 'रवि मी' चं rendition पण मला खूप आवडलं होतं. वसंतराव देशपांडे स्वर्गातून आपल्या नातवाला पाहून खुश झाले असतील. पण पुढे फार प्रयोग झाले नाहीत कारण स्वाभाविकपणे तितकीशी गर्दी होत नाही संगीत नाटकांना आजच्या काळात. मध्यंतरी सुनील बर्वे ने सुद्धा 'मानापमान' आणलं होतं म्हणतात पण ते पाहण्याचा योग आला नाही. देशाबाहेर पोटापाण्यासाठी भटकताना सगळेच आनंद कसे मिळतील? गेली - वर्षे सवाई गंधर्व ला जाताच आलं नाही. आता महोत्सवाचं नाव बदलून 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' असं अजूनच समर्पक झालंय. मागच्या वर्षीच्या सवाई गंधर्व ला अनिरुद्ध गेला होता (त्याचं लग्न झाल्यानंतर त्याला 'गुरुजी' किंवा 'भिंगरी' म्हणायचं नाही असं त्याने आणि त्याच्या बायकोने फतवा काढलाय म्हणून संपूर्ण नाव लिहिलं) तेव्हा त्याने मोबाईल वर कौशिकी चं 'याद पिया की आये' रेकॉर्ड करून whatsapp वर पाठवलं आणि खाली लिहिलं "अजूनही तशीच दिसते रे"! ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर ते thrill प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं नाही ह्याची खिन्नता होतीच. मध्ये कौशिकीने twitter वर मला 'दुबईला कधी कार्यक्रम आहे?' ह्या प्रश्नाला 'very soon' असं उत्तर दिलं होतं. हा 'very soon' खरोखरच very soon यावा अशी मनोमन इच्छा आहे. पाहू नशिबात आहे का!


माझं एक स्वप्न आहे...बेळगावला आर्ट सर्कल मध्ये एक कार्यक्रम चालू आहे...गायला भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे आहेत...साथीला पेटीवर पुरुषोत्तम वालावलकर आणि तबल्यावर बळवंतराव रुकडीकर आहेत...श्रोते म्हणून ऐकायला पु देशपांडे आणि सगळ्यांचे लाडके 'गण गोत' मधले रावसाहेब आहेत...रात्रीच्या प्रत्येक सरत्या प्रहरासोबत मैफील चढत चालली आहे...सुरांची नुसती बरसात होते आहे… 'मानापमान' विरुद्ध 'सौभद्र' अशी जुगलबंदी सुरु आहे...वसंतरावांनी 'भाली चंद्र असे धरिला' म्हणून आव्हान द्यावे आणि भीमण्णानी तितक्याच तोडीने 'नभ मेघांनी आक्रमिले' म्हणून ते लिलया परतवावे...वसंतरावांनी तितक्याच सहजतेने हळूच 'मानापमाना'तून 'सौभद्रा' शिरावे आणि 'पावना वामना या मना' गावून दाखवावे तर भीमण्णानी मांडीवरील शाल खाली टाकून कपाळावरून मागे हात फिरवून 'प्रेम सेवा शरण' गावून 'मानापमान' खिशात घालावा अशी 'स्वर्गादपि गरीयसी' स्पर्धा चालू आहे...रावसाहेब प्रत्येक समेवर "काय तिच्या आयला जमलंय की वो" किंवा "अरे ते थोडंसं 'शरणागता' वाजीव की रे" अशी इरसाल दाद देत आहेत...पु देशपांडे पेटीवाल्या वालावलकरांना आपल्या विनोदी शैलीत "अरे तुला खाल्ला की रे वसंताने, तुझ्यापेक्षा अप्पा जळगावकरांना आणायला हवं होतं" असं चिडवत आहेत...आणि ह्या सर्व सोहळ्याचा एक मूक प्रेक्षक, श्रोता आणि चाहता म्हणून मी नाममात्र कुठेतरी कोपऱ्यात बसून मनसोक्त आनंद घेत आहे! अहाहा...केवळ असं स्वप्न पडावं असं स्वप्न पाहणं देखील स्वप्नवत आहे. त्याचं कारणही तसंच आहे कारण ही माणसे तितकीच थोर आहेत. कलेला वाहून घेणारे अनेक कलावंत असतात, पण कलेला समृद्ध करणारे थोडेच असतात जे पुढे जाऊन भीमसेन होतात. वयाच्या बाराव्या वर्षी गाणं शिकायच्या प्रबळ इच्छेपोटी भीमसेन जोशी घरातून जालंधरला पळून गेले होते. अशी वेडी माणसंच इतिहास घडवतात. मगाशी ज्यांचा उल्लेख केला ते अप्पासाहेब जळगावकर तर इतके संगीतवेडे होते की अर्धांगवायू ने शरीराचा संपूर्ण डावा भाग निकामी होऊनसुद्धा आपल्या मोठ्या मुलाला हार्मोनियम च्या भात्यावर बसवून अप्पासाहेब केवळ उजव्या हाताने कित्येक वर्षे पेटी वाजवत होते. ह्यात एका शब्दाचीदेखील अतिशयोक्ती नाही. Youtube वर अप्पांचे काही थोडेच videos उपलब्ध आहेत पण त्यात सुद्धा त्यांचा मुलगा भाता हलवताना आणि अप्पा केवळ एका हाताने सहजगत्या राग कलावती वाजवताना दिसतात. संगीतात खरंच काहीतरी अगम्य जादू असावी ज्यामुळे हे असे चमत्कार घडू शकतात. जर बिस्मिल्ला खान साहेबाना भैरवी रागाची अनुभूती बनारस च्या शंकराच्या मंदिरात होत असेल तर काहीही शक्य आहे. आज ह्या लेखनानिमित्त का होईना पण माझ्याकडून ह्या सर्व दिग्गज कलावंताबद्दल एक भक्तीभाव प्रतीत झाला हीच आनंदाची गोष्ट आहे आणि त्याची पुण्याई माझ्या श्रुतींमध्ये तृषा म्हणून जमा व्हावी असा एक स्वार्थी आशावाद व्यक्त करून मी हा मराठी typing चा प्रपंच थांबवतो :)   

6 comments:

  1. Nicely written..!!! I enjoyed it....!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Pranoti...many thanks for your feedback...glad that you liked it :)

      Delete
  2. Khupach surekh Nikhil.... tuzya Shastriya sangeet avadibaddal aajach samajle....
    your writing skills are really awesome.. thouroughly enjoyed...!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Kalyanee...dhanyavad for such nice words...Bhimsen is common passion of Abhya and me :)

      Delete
  3. Great skills and passion to pen down the emotions! Very nice!

    ReplyDelete
  4. Awesome...!!! Tu lihitos khup bhari yat kahi vadach nahi ani te mi khup javalun pahilay mag tya madhe agdi pahate 3:30 - 4:00 wajata uthun TM poshter sathi chya char oli astil kiva jeev otun lihileli Maharajanvarchi (Tuza Awadta vishay) TM chi script asel...nad khula. Ek kshanbhar tari vatat hota ki mich tya saglya sangichta anubhav ghet aahe ki kay ? Tuzya likhanamadhal hech ek lai bhari mhanje tu vachanaryala saglya goshti agdi javalun dakhavtos mag tya Econamic kinva GDP related ka asenat. Pan ya madhe mala ek juni link milali timhanje....Tuzyabarobar pahlela Maz Ekmev live natak Forodiya Karnadak (Samevar Tali)... Regatta chi practice samplyavr ratri 8:30 la Nadikathi show discuss kart hoto achanak tu mhanals chal natak baghun yevu bakich nanter karu..tyavar mi jara nakar arthi kahitari uttar dil..tu mhanals are chal he tar zalach ki ata natak baghun ghevu nanter nahi milanar baghayla ( mazya mate Firodiyache fakt 3 te 4 ch play hoatat) tyatala ek to show fakt COEP sathich hota ani tyat shevtach varsh...Te natak tar dolyanche parne fednar tar hotach pan aatahi jevha kevha athavan yete mi agdi mapasun tuze abhar manto kharach.....te natak mala pahila lavlya baddal...!!! Tevha mala prashna padla aaj achanak Nikhalya natak kay mhantoy...nehami boat club var padik asela kadhitari library sodli tar achanak yala aaj Audichi athavan kaskay zali...ata kalal yach karanahi kadachit hech asav....Aso akaran kahi ka asena pan tu matra lihit raha...tuza lihilela vachal ki vatat kal paravach tuzyashi gappa karat hoto...Ani ho natakabaddal kharach Thank You baraka...Aaj sandhi milali sangaychi.....

    ReplyDelete